BJP vs NCP: मुंबई महापालिकेचा नुकताच अर्थसंकल्प जाहीर झाला. या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पानुसार ज्या वॉर्डात भाजपचे नगरसेवक आहेत त्या वॉर्डांना सर्वात जास्त निधी दिला जाणार आहे. कदाचित त्यांना इतर राजकीय पक्षांचे नगरसेवक असलेल्या इतर वॉर्डांपेक्षा तिप्पट निधीही मिळू शकतो. महापालिका आयुक्तांच्या या कारभारामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, मुंबई महापालिका भाजपचा प्रचार करत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी केला. तसेच, या अर्थसंकल्पाकडे नीट पाहिले तर या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे 'होय' असे दिसते, असेही क्रास्टो म्हणाले.
"भाजपचे वर्चस्व असलेल्या या विशिष्ट प्रभागांना जास्तीत जास्त निधी वाटप केल्यास पक्षाला मतदारांवर छाप पाडण्यास आणि आगामी महापालिका निवडणुकीत त्यांची मते मिळवण्यास मदत होईल. राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेला भाजप, महापालिका आपल्या अंगठ्याखाली आहे याची खात्री करून घेत आहे आणि दुसरीकडे चाणाक्षपणे आपल्या नेत्यांचा वापर करून जनतेला हे दाखवत आहे की महापालिकेच्या कारभारावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि त्याविरोधात बोलत आहोत. पण सत्य हेच आहे की पडद्यामागील पक्षपातीपणापासून लक्ष वळवण्याचा हा भाजपचा डाव आहे," असा आरोप त्यांनी केला.
"भाजपा एका दगडात दोन पक्षी मारून मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे राज्य सरकारमध्ये युती असूनही एकनाथ शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण या गटाचे नगरसेवक असलेल्या सर्व वॉर्डांना भाजपपेक्षा खूपच कमी निधी दिला जात आहे. एकनाथ शिंदे गटाने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी आता जनतेला जाब द्यावा की, जनतेच्या खिशातून आलेल्या पैशांचे सर्वाधिक वाटप शहरातील भाजपचे वर्चस्व असलेल्या प्रभागांमध्ये का केले जात आहे?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.