NCP DCM Ajit Pawar News: आता आपल्याला वेळ कमी आहे. सुरुवात चांगली झाली आहे त्यामध्ये सातत्य ठेवा. आठवड्यातील एक दिवस आपल्या आमदारांना वेळ द्यायला सांगेन. कार्यकर्ते कामाला लागले की काय होते हे दिसले. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युद्ध आपल्याला जिंकायचे आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
मुंबईमध्ये पक्ष ज्या पद्धतीने वाढायला हवा होता. तशा प्रकारचा पोहोचला नाही. आमचे लक्ष फक्त ग्रामीण भागाकडे राहिले. आता समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जे काम सुरू आहे त्यातून आपल्याला नक्कीच बळ मिळेल. काम करताना खटका उडत असतो मात्र तो समजून घेऊन काम करा. ज्याला पद देत आहात किंवा देणार आहात त्यांची प्रतिमा त्याच्या विभागात चांगली आहे का याचाही विचार करा. शिवसेना फक्त मुंबईत होती त्यानंतर ती कोकणात पोहोचली. आपल्यातही ती जिद्द आहे आपणही तसे काम सुरू करु, असे विश्वास अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
खोलात जाऊन माहिती घेऊ
सकाळी मुंबईतील वेगवेगळ्या भागात येतो. लोकहिताच्या कामांची पाहणी करतो. या मुंबापुरीला एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही. धारावीतील टेंडरमुळे एका उद्योगपतीला फायदा होणार आहे अशी बोंब मारली जात आहे. त्याच्या खोलात जाऊन माहिती घेऊ. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. प्रश्न सोडविण्याची ताकद आणि धमक आपल्यात आहे. काहीजण आज करतो उद्या करतो सांगत असतात अरे काय देवळातील घंटा आहे का, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला. तसेच स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी काम करत नाही किंवा सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. पहाटे उठून लोकांची कामे कशी होतील असा माझा प्रयत्न असतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीच्या माध्यमातून सरकार राज्यात काम करत आहेत. मुंबईत विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेत योग्य ती आणि म्हणावी अशी संख्या गाठू शकलो नाही. आपल्या वॉर्डात निवडणूक लढणार्या व्यक्तीच्या पाठीशी ताकद उभी करायला हवी. अल्पसंख्याक, ओबीसी, मागासवर्गीय या समाजांना निधीची कमतरता भासू दिली नाही. आपण वंचित व बहुजनांकरिता काम करत आहोत. चांद्यापासून बांद्यापर्यंत जास्तीत जास्त जागा निवडून कशा येतील असा प्रयत्न करायचा आहे. हे राज्य माझे आहे, सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे हा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस जनतेला काम करताना देत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.