NCP Ajit Pawar News: आम्ही राष्ट्रवादीच्या सगळ्या नेतेमंडळींनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. १४ तारखेपासून बारामती येथून रॅली सुरु करणार आहे. येणाऱ्या विधासभेच्या निमित्ताने काय साधारण निर्णय घेतले आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. या कामाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन करत आहोत. प्रचाराची सुरुवात आणि पक्ष मजबुत करण्यासाठी महाराष्ट्रात दौरे करणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी दिली.
मुंबईत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री व पदाधिकारी पक्ष कार्यालयात एकत्र जमले आणि त्यानंतर श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने त्याची सुरुवात म्हणून माझ्या सर्व मंत्री आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमवेत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले, असे अजित पवार म्हणाले.
आम्ही जनतेसमोर त्यांचे आशिर्वाद मागण्यासाठी जात आहोत
आम्ही जनतेसमोर त्यांचे आशिर्वाद मागण्यासाठी जात आहोत. सिद्धीविनायकाने आम्हाला आशिर्वाद द्यावेत त्यासाठी विजयाची खूण दाखवली आहे. शेवटी जनता-जनार्दन सर्वकाही असते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत. चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे. १४ जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात केल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारने केलेल्या घोषणा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज
सगळ्या गणेश भक्ताचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री सिद्धिविनायकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृ्त्त्वाखाली सगळ्या नेतेमंडळींनी दर्शन घेतले. आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी सर्मपित होऊन उद्याच्या भवितव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा श्री गणेशा करत आहोत. राष्ट्रवादी पक्ष महायुतीतील पक्ष म्हणुन आगामी निवडणुकांना सामोरे जात आहे. अशा वेळेला श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. राज्य सरकारने ज्या योजनांची घोषणा केलेली आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली.