Join us

CM देवेंद्र फडणवीस की DCM एकनाथ शिंदे अधिक जवळचे कोण? अजित पवारांनी लगेच सांगितले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:02 IST

Deputy CM Ajit Pawar News: सर्वांत उत्तम मुख्यमंत्री कोण वाटतात? यावरही अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

Deputy CM Ajit Pawar News: बीड, परभणी प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. महायुती सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुढे आला. नागपूर येथे मोठा हिंसाचार झाला. यावरूनही विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यानंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीवरूनही महायुतीवर विरोधक टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच अजित पवारांनी त्यांना अधिक जवळचे कोण आहे, असा प्रश्न विचारताच लगेचच उत्तर दिले. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपण सरकार म्हणून एसआयटी नेमली आहे, त्याचप्रमाणे सीआयडी नेमली आहे. या सगळ्या चौकशीत धनंजय मुंडे यांचे नाव कुठेही आलेले नाही. संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारले ते व्हायरल फोटो पाहून आम्हालाही वेदना झाल्या. त्यानंतर आम्ही सगळे बसलो, त्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. या प्रकरणात आम्ही कुणालाही पाठिशी घालणार नाही, कोणतेही चुकीचे कृत्य खपवून घेणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

CM देवेंद्र फडणवीस की DCM एकनाथ शिंदे अधिक जवळचे कोण? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळचे आहेत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवारांनी क्षणाचाही विलंब न करता, देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे तेच जवळचे आहेत. सध्या कुणालाच नाराज करणार नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पद्धतीने तर मी माझ्या पद्धतीने चांगले संबंध ठेवले आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. सर्वांत उत्तम मुख्यमंत्री हे विलासराव देशमुख वाटतात, त्यांनी उत्तम कारभार केला असे अजित पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, माझे काम स्ट्रेट फॉरवर्ड असते. बीड असो किंवा पुणे असो चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई करणार होणारच. कायद्याचे पालन सगळ्यांनी करावे अशी माझी भूमिका असते. छगन भुजबळ यांनी अनेक ठिकाणी काम केले. विधानसभा, विधानपरिषदेवर काम केले आहे. त्यांनी राज्यसभेवर जावे असे मला वाटत होते. छगन भुजबळांना नाराज करण्याचा माझा किंवा पक्षाचा हेतू नव्हता, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेमहायुती