Exclusive: “गोपीनाथ मुंडेंचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही, याची सल कायम राहील”: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 01:08 PM2021-11-27T13:08:04+5:302021-11-27T13:09:08+5:30
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत धनजंड मुंडे यांनी भावूक प्रसंग आणि गोपीनाथ मुंडेंविषयी आठवणी सांगितल्या.
मुंबई:गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचं पार्थिव मिलिट्रीच्या विमानानं लातूरपर्यंत आणलं जाणार होतं. मात्र, या घडामोडीत गोपीनाथ मुंडे यांच्यावर अंतिम संस्कार करताना त्यांचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही, याची सल कायम आयुष्यभर लागून राहील, अशी भावूक आठवण धनंजय मुंडे यांनी सांगितली. लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस अंतर्गत धनंजय मुंडे यांची मुलाखत घेतली. यावेळी राजकारणाच्या पलीकडे धनंजय मुंडे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो होतो. तेव्हा पार्टी ऑफिसमधून गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव शरीर विमानतळाकडे निघालं होतं आणि दिल्ली विमानतळावरून मिलिट्रीच्या विमानाने ते लातूरपर्यंत नेलं जाणार होतं. रस्त्यात असतानाच गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव नेत असताना पाहिलं. विमानतळावर गेल्यानंतर मी अतिशय दुःखी होतो. त्यावेळेस मला साहेबांच्या सोबत जाता आलं नाही. अग्नि देताना ज्याला आपण शेवटचं दर्शन घेणं म्हणतो, ते शेवटचं दर्शनही मला घेता आलं नाही. ही जीवनामध्ये आयुष्यभर सल करत राहणारी गोष्ट आहे, असा भावूक प्रसंग धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितला.
गोपीनाथ मुंडेंचा जास्त प्रभाव
पंडित अण्णा आणि गोपीनाथ मुंडे या दोघांकडून बरंच काही शिकायला मिळालं. मात्र, स्वाभाविकपणे गोपीनाथ मुंडे यांचा माझ्यावर सर्वांत जास्त प्रभाव होता. पंडित अण्णा फार शिस्तप्रिय होते. आताच्या घडीला या दोन्ही व्यक्तींचे निधन झाले आहे. त्यामुळे आमच्या परिसरात काम करताना दोघांच्या कार्य पद्धतीने काम करावं लागतं, असं धनंजय मुंडे यांनी नमूद केलं.
पहाटेच्या शपथविधी प्रसंगानंतर तसं घडायला नको होतं
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला. मी आदल्यादिवशी त्यांच्यासोबत होतो. आम्ही सगळेच जण एकत्र होतो. सलग आठ दिवस खूप प्रवास झाला होता. मी ठरवलं होतं की, दुसऱ्या दिवशी मला आराम करायचा आहे. बंगल्यावर कोणी ना कोणी येऊन मध्येच उठवायला नको, यासाठी गोळ्या घेऊन मित्राच्या फ्लॅटवर आराम करायचं ठरवलं. तसं पाहायला गेलं तर दुसऱ्या दिवशी काही विशेष कामही नव्हतं. त्यामुळे असं काही घडेल, याची कल्पनाही नव्हती. दुपारी १ नंतर उठलो. त्यानंतर सगळा प्रसंग मला समजला. मात्र, तोपर्यंत खूप काही घडून गेलं होतं. माझ्याबाबतही काही प्रश्न उपस्थित करण्यात आले, असं घडायला नको होतं. तो दिवस टाळायला हवा होता. ते शल्य कायम राहील, असं धनंजय मुंडे यांनी नमूद केले.