मुंबई: रुसून राहिले अगदी माझ्या जवळचेच, मी कुणाला कळलोच नाही, असे सांगत माझं आणि पंकजाताईचं जेवढं जमलं किंवा जमत होतं, तेवढं मला वाटत नाही की अन्य कुणाचं जमलं असेल. पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि आमचे संबंध सुधारतील, असं मला वाटत नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस अंतर्गत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची मुलाखत घेतली. यावेळी राजकारणाच्या पलीकडे धनंजय मुंडे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही जेव्हा राजकीयदृष्ट्या वेगळे झालो, त्यानंतर जे काही घडलं, ते काही सार्वजनिकरित्या सांगण्यासारखं नाही. मात्र, सन २००९ पूर्वी पंकजाताई आणि माझं बहीण-भावाचं नातं हे खूप घट्ट होतं. रक्षाबंधनाला सर्वप्रथम पंकजाताई आणि प्रीतमताईंकडून राखी बांधून घ्यायचो. मगच सख्ख्या बहिणी राखी बांधायच्या. अगदी भाऊबीजेलाही हीच बाब घडायची. अगदी कळतं वय नसल्यामुळे हे चालत आलं होतं, असं धनजंय मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
पंकजाताई आणि माझं खूप चांगलं जमत होतं
बहीण-भावंडांमध्ये पंकजाताई आणि माझं जेवढं जमत होतं. मला वाटत नाही की, अन्य कुणाचं जमत होतं किंवा जमलं असेल. सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांना मनमोकळेपणाने सांगायचो. खुलेपणाने शेअर करायचो. सन २००९ पर्यंत आमचे फार चांगले संबंध होते. मात्र, त्यानंतर काही फारसं चांगलं राहिलं नाही. अनेकदा मीही प्रयत्न केला. माझे वडील गेल्यानंतर तसेच गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न केला. घर एकत्र ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केला. मात्र, त्यात मला यश आलं नाही. भलेही तुम्ही राजकारण वेगवेगळं करा. पण घर एकत्र ठेवून त्या पद्धतीने काही करता येतं का, यासाठी प्रयत्न केले, असं धनंजय मुंडे यांनी सांगितले.
कुणी मानलं नाही, तरी मी घरात मोठा आहे
आमच्या कुटुंबात माझे वडील सगळ्यांमध्ये मोठे होते. त्यानंतर मी आहे. कुणी मानलं नाही, तरी घरात मी मोठा आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे घर एकत्र राहिलं पाहिजे, यासाठी प्रयत्नशील असतो. घर हे राजकारणापलीकडे आहे, असं मी समजतो. त्यामुळे घरातील सर्व सदस्य एकत्र असावेत. एकोप्याने राहावेत, असं मला कायम वाटतं. भले घरात दोन पक्षांचे विचार असतील. एकमेकांविरोधात निवडणूक लढायची असेल, तरी लढू शकतात. पण, घर म्हणून सुख आणि दुःखात, सर्व गोष्टीत जो संवाद असायला हवा, तो नाही, असं धनंजय मुंडे यांनी मोकळेपणाने सांगितलं.