Join us

Dilip Walse Patil Reply Devendra Fadnavis: “पवारांच्या भूमिका लोकांना माहितीयेत, ट्वीटचा फायदा नाही”; वळसे-पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 9:11 PM

Dilip Walse Patil Reply Devendra Fadnavis: शरद पवारांवर टीका करणे हा आता सगळ्यांचा आवडता छंद झाल्याचा टोला दिलीप-वळसे पाटील यांनी लगावला आहे.

मुंबई: अनेकविध मुद्द्यांवरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असल्याचे दिसत आहे. यात आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेची भर पडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकामागून एक १४ ट्विट्स करत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर पलटवार केला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू केले. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच राज्यात जातीयवाद, जातीयद्वेष वाढला, असा मोठा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शरद पवारांवर निशाणा साधला. इशरत जहाँला फक्त निर्दोषच म्हटले गेले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी तिला मदत देखील देऊ केली. तसेच, त्या काळी आयबीच्या अधिकाऱ्यांचा देखील अपमान राष्ट्रवादीकडून झाला. तसेच, बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील कलम ३७० ला विरोधच होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याला दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. 

पवारांच्या भूमिका लोकांना माहितीयेत, ट्वीटचा फायदा नाही

शरद पवारांवर टीका करणे हा आता सगळ्यांचा आवडता छंद झाला आहे. शरद पवार यांच्या राजकारण आणि समाजकारणातल्या भूमिका वर्षानुवर्ष लोकांना माहिती आहेत. अशा प्रकारचे ट्वीट करून त्यात काही फायदा होईल, असे मला वाटत नाही, असा पलटवार दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध जोडला जात असल्याबाबत बोलताना, ही काही नवीन बाब नाही. यापूर्वी देखील अशाच प्रकारे प्रयत्न झाले. नवाब मलिक यांची केस पीएमएलए कायदा येण्यापूर्वीची आहे. इतकी जुनी केस काढून दाऊदशी कोणताही संबंध नसताना ओढून-ताणून संबंध जोडायचा हा प्रकार आहे. या पूर्वीही शरद पवारांशी असा संबंध जोडायचा प्रयत्न भाजपने केला होता. मला त्यात काही तथ्य दिसत नाही, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाची देवेंद्र फडणवीसांनी आठवण करुन देत शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.  

टॅग्स :दिलीप वळसे पाटीलदेवेंद्र फडणवीसशरद पवार