ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला धक्का, माजी नगरसेवकाने केला शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:13 PM2019-04-20T17:13:48+5:302019-04-20T17:14:26+5:30
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू वैती यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रोळी येथील माजी नगरसेवक हारून खान यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे
मुंबई - ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू वैती यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रोळी येथील माजी नगरसेवक हारून खान यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. हारून खान यांच्या पत्नी ज्योती हारून खान या मुंबई महापालिकेच्या विद्यमान नगरसेविका असून हारून खान यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ईशान्य मुंबईत महायुतीला चांगलाच फायदा होणार आहे.
ईशान्य मुंबई मतदारसंघातील विक्रोळी पार्कसाईट येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. शनिवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या कारणाबाबत विचारले असता हारून खान म्हणाले की, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या खूपच कमी असल्याने स्थानिक स्तरावर काम करताना अनेक अडचणी येतात. माझ्या वार्डमधील रुग्णालयाचे काम निधीअभावी रखडले आहे. तसेच एका सभागृह बांधणीचे कामही रखडले आहे. शिवसेना ही महापालिकेत सत्ताधारी असल्याने आता ही कामे त्वरीत मार्गी लागतील. आपण कुणी बडे नेते नसून स्थानिक स्तरावर काम करणारे एक छोटे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे स्थानिक स्तरावरील कामे मार्गी लावण्यासाठीच आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे ते म्हणाले. शिवाय आता महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारातही आपण सहभागी होणार असून माझ्या भागातील अधिकाधिक मते त्यांना मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असेल असेही खान यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक नंदू वैती यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्थानिक नेतृत्वाची काम करण्याची पद्धत पसंत नसल्याने आपण पक्ष सोडत असल्याचा आरोप करत त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील यांना लक्ष केले होते. नगरसेवक पदावरून पायऊतार झाल्यानंतर स्थानिक नेतृत्वाकडून आपली साधी विचारपूसही न केल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.
याबाबत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांना विचारले असता, हारून खान आणि त्यांच्या अगोदर नंदू वैती यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमधून महत्वाचे नेते आणि पदाधिकारी महायुतीत सामिल होत आहेत, ते पाहता फक्त मतदारांचीच नव्हे तर राजकीय नेत्यांचीही या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा मोदीजी विराजमान व्हावेत, अशी इच्छा असल्याचे ते म्हणाले