लोकसभा २०२४ च्या निवडणुका आता १० महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या दृष्टीकोनातून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात लोकसभेच्या ४८ जागांसाठी निवडणूक होणार असून भाजपने ४० जागा जिंकण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. त्यादृष्टीने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून हालचाली सुरू आहेत. तर, शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन भाजप हे मिशन पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही भापला रोखण्यासाठी मेरीटवर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याचं निश्चित केलंय. त्यातच, आज राष्ट्रवादी काँग्रेसचीलोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रिफ यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला राज्यभरातून आमदार-खासदारांचीही उपस्थिती होती. महाविकास आघाडी म्हणूनच आपण लोकसभेच्या निवडणुका लढवणार आहोत, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर, जागावाटपाचाही फॉर्म्युला वरिष्ठ नेते ठरवतील, असेही त्यांनी सांगितले होते.