Join us

राष्ट्रवादीची अधिकची मते शिवसेनेला; पालिका निवडणुकीतील आघाडीसाठी होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 6:19 AM

शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची मते दिल्यानंतर उर्वरित ११ मते शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना द्यावीत. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेससोबत चर्चा करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना केल्या आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, खासदार तसेच प्रमुख नेत्यांची आढावा बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. यावेळी प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खा. सुप्रिया सुळे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.

आगामी राज्यसभा निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. राष्ट्रवादीकडील अधिकची मते शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना द्यावीत. तसेच, आगामी १४ महापालिकांच्या निवडणुकीतील आघाडीसाठी चर्चा करावी.  शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा करुन आघाडीसंदर्भात समस्या असल्यास समजून घ्या, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्याचे समजते.

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रश्नामुळे आता जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर जातनिहाय गणना व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चर्चा करणार आहेत. जातनिहाय जनगणनेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत अपक्षांची भूमिका महत्त्वाची

राज्यसभा निवडणुकीत अपक्षांची भूमिका महत्त्वाची बनली आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांना महाविकास आघाडीसोबत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर सोपविण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे समजते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. या दोन्ही नेत्यांच्या मतदानासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. देशमुख आणि मलिकांना मतदानासाठीची परवानगी मिळावी यासाठीची न्यायालयीन प्रक्रिया गांभीर्याने घ्यावी आणि आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचे समजते.

टॅग्स :शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसराज्यसभानिवडणूक