ईशान्य मुंबई लोकसभा जागेसाठी NCP आग्रही; कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 03:34 PM2024-01-19T15:34:29+5:302024-01-19T15:35:36+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारी करत आहेत. त्यात राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं मिशन भाजपानं हाती घेतले आहे.

NCP insists on North East Mumbai Lok Sabha seat; Activists demanded Sharad Pawar | ईशान्य मुंबई लोकसभा जागेसाठी NCP आग्रही; कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

ईशान्य मुंबई लोकसभा जागेसाठी NCP आग्रही; कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आता जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सध्या मुंबईतील ६ लोकसभेच्या जागेपैकी ३ शिवसेना आणि ३ भाजपाकडे आहेत. मात्र २०१९ नंतर राज्यातील समीकरण बदललं आहे. त्यात महाविकास आघाडीकडून ईशान्य मुंबई मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली जावी यासाठी मित्रपक्षासोबत चर्चा करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली आहे. शुक्रवारी सकाळी NCP पदाधिकाऱ्यांनी बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव, सरचिटणीस रवींद्र पवार, प्रवक्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

या भेटीनंतर प्रवक्ते अमोल मातेले म्हणाले की, सध्या राज्यात राजकीय अस्थिरता आहे. काही 'बड्या' नेत्यांच्या सततच्या पक्षांतरामुळे त्यांची प्रतिमा जनमाणसात मलिन झाली आहे. सत्ताधारी भाजप पक्षाने मतदानाचा गैरवापर करून मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा बळकवल्या. मुलुंड, घाटकोपर (पश्चिम), भांडुप, विक्रोळी, घाटकोपर (पूर्व)आणि मानखुर्द भागात भाजपाविरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पट्ट्यात खासदार मनोज कोटक यांनी जनतेसाठी गेल्या पाच वर्षांत काहीच काम केले नाही. याआधी या मतदारसंघात किरीट सोमय्या हे भाजपाचे खासदार होते. केवळ हुकूमशाहीच्या बळावर निवडून आलेले मनोज कोटक यांना जनतेने सपशेल नाकारले असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत २०१४,२०१९ वगळता या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा तिथे मोठा वर्ग आहे. तिथे मराठी, अल्पसंख्यांक आणि उत्तर भारतीय जनता राहते. त्यांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आस्था आहे. जनतेला येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून द्यायचे आहे असा विश्वास अमोल मातेले यांनी व्यक्त केला. या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवारांनी चर्चा केल्यानंतर २५ आणि २६ जानेवारी दरम्यान मित्र पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होईल या बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल असं आश्वासन पवारांनी त्यांना दिले. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारी करत आहेत. त्यात राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं मिशन भाजपानं हाती घेतले आहे. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने या दोन्ही पक्षात मोठी उलथापालथ झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होती. त्यातून मुंबईतील सहाही जागा युतीने जिंकल्या होत्या. त्यात मनोज कोटक, पूनम महाजन, गोपाळ शेट्टी हे भाजपाचे खासदार निवडून आले होते. तर दुसरीकडे शिवसेनेचे गजानन किर्तीकर, राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत निवडून आले. परंतु गजानन किर्तीकर, राहुल शेवाळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहेत तर अरविंद सावंत उद्धव ठाकरे गटासोबत आहेत. त्यामुळे मुंबईतील या जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. 
 

Web Title: NCP insists on North East Mumbai Lok Sabha seat; Activists demanded Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.