Join us  

शरद पवारांचा निर्णय अन् जयंत पाटलांना अश्रू अनावर; शब्दही फुटत नव्हते, टोपेंनी सावरले, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 1:48 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे.

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज शरद पवार यांनी केली. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली. यावेळी सभागृहात सर्व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सभागृहात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. 

शरद पवारांची मोठी घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, आम्ही सगळी राज्यात पवार साहेब यांच्या नावावर मत मागतो, आता पवार साहेब बाजूला गेले तर आम्ही कुणाकडे पाहून मत मागायची. आताही राष्ट्रवादी पक्ष पवार साहेब यांच्या नावावर ओळखतो त्यामुळे असं अचानक शरद पवार यांनी बाजूला जाण्याचा निर्णय घेण बरोबर नाही. त्यांनी राजीनाम्याचा निर्णय  मागे घ्यावा, असंही जयंत पाटील म्हणाले. यावेळी बोलताना जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. यावेळी सभागृहात एकच शांतता होती. 

" तुम्ही अलिकडे भााकरी फिरवण्याचे म्हणाला, पवार साहेब आम्ही सगळे अधिकार तुम्हाला देतो. पण, तुम्ही राजीनाम्याचा निर्णय मागे घ्या. तुम्हाला पक्ष नव्या लोकांच्या हातात कसा द्यायचा आहे तो द्या पण तुम्ही हा निर्णय मागे घ्या. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कोणीच काम करु शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सगळे थांबतो. हा पक्ष ज्यांना चालवायचे आहे त्यांना चालवू दे, असंही जयंत पाटील म्हणाले.   

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली ६३ वर्ष अविरत सुरू आहे. यातील ५६ वर्ष मी कुठल्या ना कुठल्या सभागृहात सदस्य म्हणून काम केलं आहे. राज्यसभेची पुढची तीन वर्ष राहिली आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या अधिकाधीक प्रश्नांवर लक्ष घालण्यावर माझा भर असेल, असंही शरद पवार म्हणाले.  

आपल्याला माहिती आहे, माझा अनेक संस्थांशी कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदीर मुंबई, महात्मा गांधी सर्वादय संघ, अशा अनेक संस्थांच्या कामकाजामध्ये माझा सहभाग आहे, या कार्यांवर मी अधिक भर देणार आहे, असंही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :जयंत पाटीलशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार