कार्यकर्त्यासाठी जयंत पाटील मैदानात; भाजप आमदारांवर केला गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 07:40 PM2024-03-01T19:40:49+5:302024-03-01T19:42:23+5:30
केवळ राजकीय आरोप करण्यासाठी या सदस्यांनी अध्यक्षांची आणि सभागृहाची दिशाभूल केली आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
Jayant Patil ( Marathi News ) : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या व्हिडिओवरून काल सभागृहातही वादंग झालं आणि भाजप आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर गंभीर आरोप केले. भाजपच्या या टीकेला आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. "काल एका व्हिडिओवरून सभागृहात गदारोळ झाला. या व्हिडिओत योगेश सावंत आहेत असा उल्लेख आमदार आशिष शेलार आणि आमदार राम कदम यांनी केला. इतर अनेक आरोप देखील केले. मुळात त्या व्हिडिओत योगेश सावंत नाहीत, तर तो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे या दोन्ही सदस्यांनी सभागृहात दिलेली माहिती चुकीची आहे. केवळ राजकीय आरोप करण्यासाठी या सदस्यांनी अध्यक्षांची आणि सभागृहाची दिशाभूल केली आहे. आमची मागणी आहे की, ते तपासावे आणि पटलावरून काढून टाकावे," अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
भाजपवर निशाणा साधताना जयंत पाटील पुढे म्हणाले की, "आपल्या सभागृहाला ऐतिहासिक परंपरा आहे. इथे उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला मोल असते. त्यामुळे सभागृहात चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अनादर करणाऱ्या सदस्यांना समज द्यावी."
काल एका व्हिडिओवरून सभागृहात गदारोळ झाला. या व्हिडिओत योगेश सावंत आहेत असा उल्लेख आ. आशिष शेलार, आ. राम कदम यांनी केला. इतर अनेक आरोप देखील केलेत. मुळात त्या व्हिडिओत योगेश सावंत नाहीत, तर तो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे या दोन्ही सदस्यांनी सभागृहात… pic.twitter.com/5lytJU9zSD
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 1, 2024
योगेश सावंतला अटक
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे मारण्याची धमकी दिलेला व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील सांताक्रूझ पोलिसांनी योगेश सावंत या तरुणाला अटक केली. त्याला काल कोर्टासमोर हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली. फडणवीस यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषा वापरून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनोळखी व्यक्तिविरोधात विरोधात कलम १५३ (ए), ५००, ५०५ (३), ५०६ (२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंद केला होता.
दरम्यान, "होय, योगेश सावंत हा माझा कार्यकर्ता असून त्याची चूक काय?" असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला होता. तसेच उगाच भाजपानं नाटके करू नये. तो कार्यकर्ता आहे. त्याने काय चूक केली? एका युट्यूब चॅनेलने सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत घेतली ती त्याने त्याच्या सोशल मीडियावर टाकली. आता तुम्ही त्या युट्यूब चॅनेलवर कारवाई करत नाही. ज्याने मुलाखत घेतली त्याच्यावर काही करत नाही. मात्र या कार्यकर्त्यांवर तुम्ही कारवाई करता, असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला होता.