मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना ८१ वा वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्तुतिसुमने उधळली आहेत. शरद पवार हे पॉवर हाऊस नेते आहेत. त्यांचा नेम अचूक असतो. त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होते, हा इतिहास आहे. महाराष्ट्रात, देशात माणसे कशी जोडायची, हे पवारांनी शिकवले, असे कौतुकोद्गार जयंत पाटील यांनी काढले.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. मराठवाडा विद्यापीठ नामकरण, महिलांचे आरक्षण तसेच महाविकास आघाडी निर्माण करण्याचा निर्णय आदी महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. यामुळे परिवर्तन झाले. देशातील कोणत्याही नेत्याला त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागते, असे पाटील म्हणाले.
२०२४ नाही, त्यापुढचा विचार करा
विचारांची लढाई उभी करायची असेल, तर गावागावात जाऊन विद्यार्थ्यांचे, तरुणांचे मार्गदर्शन घ्यावे. विद्यार्थी राष्ट्रवादीला आम्ही एवढेच सांगतो की, २०२४ चा विचार करू नका. त्यापुढचा विचार करा. लोकापर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळातल्यांशी संवाद साधावा. काँग्रेस पक्षाने सेवादल नावाची संघटना स्थापन केली. महात्मा गांधींचा विचार त्यामागे होता, असेही पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत. त्यांनी कृषी, संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार आहेत, या शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.