Join us

जितेंद्र आव्हाडांनी भाजप नेत्याची मागितली जाहीर माफी; पण का? जाणून घ्या नेमके काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 5:07 PM

ओबीसींविषयी केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली जात आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीएत. मात्र, एका कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सर्वांसमक्ष भाजप नेत्याची जाहीर माफी मागितली आहे. 

मुंबईतील शहरातील बहुप्रतिक्षित बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झाली. नायगावमधील बीडीडी चाळीतील दोन जुन्या इमारती राज्याचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पाडण्यात आल्या. यावेळी भाजपचे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांना निमंत्रण देण्यात आले नाही. याची सल कालिदास कोळंबकर यांनी मीडियासमोर बोलून दाखवली. यामुळे चांगलेच मानापमान नाट्य रंगले.

 स्थानिक आमदार म्हणून निमंत्रण द्यायला पाहिजे होते

शिवशाहीचे सरकार असताना बीडीडी चाळीतील पुनर्विकासात ३०० चा कार्पेट एरिया मिळत होता. फडणवीस सरकारच्या काळात तो ५०० चौरस फूट करण्यात आला. या कामाला आव्हाड यांनी गती दिली. ते प्रत्येक अडचणीला धावून येतात. फक्त या विभागाचा स्थानिक आमदार म्हणून मला कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला पाहिजे होते, या शब्दांत कालिदास कोळंबकर यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बाजूलाच उभ्या असणाऱ्या आव्हाड यांनी सॉरी, सॉरी, सॉरी, सॉरी... आता अजून काय पाहिजे?, असे म्हणत कोळंबकर यांची जाहीर माफी मागतली. 

कालिदास कोळंबकर जवळचे मित्र 

कालिदास कोळंबकर हे माझे जवळचे मित्र आहेत. ते कायम माझ्यासोबत असतात. म्हाडाकडून त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते वेळेत येऊ शकले नाहीत. यासाठी मी त्यांची क्षमा मागितली आहे. आता मित्र या नात्याने ते मला माफही करतील, असे आव्हाड यांनी म्हटले.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारण उमटताना दिसत आहेत. भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली असून, राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांचा राजीनामा घेतील का, अशी विचारणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.  

टॅग्स :जितेंद्र आव्हाडभाजपाकालिदास कोळंबकरमुंबई