“एसटीच्या ७० हजार कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३५० रुपये घेतले”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 03:32 PM2021-11-26T15:32:44+5:302021-11-26T15:34:00+5:30
जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत एसटी संप आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या नेत्यांसंदर्भात मोठा दावा केला आहे.
मुंबई: वेतनवाढ आणि विलिनीकरणासह अन्य काही मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आणि आझाद मैदानावर सुरु केलेल आंदोलन आता मोठ्या प्रमाणात मागे पडताना दिसत आहे. राज्य सरकारने केलेल्या पगारवाढीनंतर आता काही आगारांमधून एसटी सेवेला पुन्हा प्रारंभ होताना दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. एसटीच्या ७० हजार कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३५० रुपये घेतले, असा दावा आव्हाडांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या या मोठ्या आरोपांनंतर राजकारणात एकच खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत एसटी संप आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या नेत्यांसंदर्भात मोठा दावा केला आहे.
एसटी संप कर्मचारी उपाशी आणि नेते तुपाशी
प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये घेण्यात आले. एकूण ७० हजार कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची लूट करण्यात आली. ST संप कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान, आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये. एसटी कर्मचाऱ्यांची लवकरच कामावर हजर राहावे, अन्यथा कठोर निर्णय घेऊ. राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमचा लेखाजोखा मांडला आहे. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते, पण काही कारणास्तव ते होत नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यापूर्वी म्हटले होते.
दरम्यान, एसटी संपाबाबत बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, कुठे संप सुरू आहे? नेते निघून गेले आहेत. अनेक कर्मचारी कामावर येत आहेत. काही लोक नौटंकी करत आहेत. कामगार आता कामावर येण्याच्या मनस्थिती आहेत. त्यांना भरघोस वेतनवाढ दिली आहे. विलीनीकरणाचा विषय न्यायालयात आहेत. कामगरांनी कामावर जाण्यातच त्यांचे हित आहे. जे कोणी वकील आहेत. ते कामगारांना भडकावत आहेत. ते कामगारांना जगवायला येणार नाहीत. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था पाहिली आहे. एसटी कर्मचारीही मराठी बांधव आहेत. त्यांनी शहाणपणाने आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि कामावर यावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
350 रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 26, 2021
70000 कर्मचारी
कर्मचाऱ्यांची लूट
ST संप
कर्मचारी उपाशी
नेते तुपाशी