मुंबई: राज्यभरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष उत्साहात साजरे करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आरोपांची आतषबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत अनेकांवर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तसचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेत त्यांची भाषणे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी कोण चालवते असे म्हटले तर ते उद्धव ठाकरे चालवतात. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत, की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात. त्यांच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोक सुट्टी असली की एखादा छान बोलणार वक्ता असला की जातात भाषणाला हा इतिहास आहे महाराष्ट्राचा, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंवर केली आहे.
ही विचारांची प्रगती आहे की अधोगती आहे हे समजत नाही
लाखोंच्या सभेसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणे फार सोपे असते. पाच वर्षांपूर्वी जे राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करायचे की, असे उद्योग आणले पाहिजेत तसे उद्योग आणले पाहिजे. कधी रतन टाटाशी चर्चा, कधी गोदरेजशी चर्चा, कधी यांच्याशी चर्चा कधी त्यांच्याशी चर्चा, असे एक विकासाचे मॉडेल घेऊन पोरांना नोकऱ्या लावतो, असे म्हणायचे. ब्लूप्रिंट देणारे राज ठाकरे आता त्याच पोरांना मशिदीच्या बाहेर भोंगे लावण्यास सांगतात. ही विचारांची प्रगती आहे की अधोगती आहे हे समजत नाही, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांनी आजोबांची पुस्तके वाचायला हवी होती
राष्ट्रवादी सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात एकही दंगल घडलेली नाही. दंगल कशाला म्हणतात हे राज ठाकरे यांना माहिती नाही. राज ठाकरे यांनी आजोबांची म्हणजेच प्रबोधनकारांची पुस्तके वाचायला हवी होती. त्यांना जात पात काय असते हे समजले असते आणि जात-पातचे जन्मदाते कोण आहेत हेही समजले असते. जातपात कशाला म्हणतात? मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे. छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत ते आता राज्याचे अन्न नागरीपुरवठा मंत्री आहेत. तटकरे लोकसभेत खासदार आहेत सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणे हे शरद पवारांचे आवडते काम आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.