मुंबई - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक 2022 च्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. 10 आणि 14 फेब्रुवारी रोजी पश्चिम यूपीमध्ये हे मतदान होणार आहे. पण, राज्यातील या भागात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. प्रचारादरम्यान अनेकांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तर काही जणांवर चिखलफेक आणि दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. याच दरम्यान महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी योगी आदित्यनाथांवर (BJP Yogi Adityanath) जोरदार हल्लाबोल केला आहे. योगींचा एक व्हिडीओ शेअर करत निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. एक व्हिडीओ पोस्ट करून ट्वीट केलं आहे. यामध्ये "एवढंच राहिलं होतं. देवालाही त्यांनी जातीचा दाखला देऊन टाकला" असं आव्हाडांनी म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये हिंदुस्थान टाईम्सला योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या मुलाखतीमधला एक 23 सेकंदांचा भाग आहे. यामध्ये पत्रकाराने योगी आदित्यनाथ यांना "तुम्ही फक्त राजपुतांचं राजकारण करता असं म्हटलं जातं तेव्हा तुम्हाला दु:ख होतं का?" असा प्रश्न केला आहे.
प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी या प्रश्नावर उत्तर देताना क्षत्रिय जातीविषयी भूमिका मांडली आहे. "मला अजिबात दु:ख होत नाही. क्षत्रिय जातीत जन्म घेणं काही गुन्हा नाही. या देशातील एक अशी जात आहे ज्यात खुद्द देवानं देखील जन्म घेतला आहे. आणि वारंवार जन्म घेतला आहे. त्यामुळे आपल्या जातीचा प्रत्येकाला अभिमान असायला हवा" असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळवला होता. मात्र, यावेळी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलाची युती आणि शेतकरी आंदोलनामुळे ग्रामस्थांची नाराजी यामुळे येथे सत्ताधाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. अशाच एका प्रकरणात शिवलखास विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मनिंदरपाल सिंग यांच्यावर 24 जानेवारी रोजी चुर गावात हल्ला झाला होता. या प्रकरणात सिंग यांनी तक्रार दाखल केली नाही, परंतु पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि गुरुवारी 20 नावांसह आणि इतर 65 अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला.