Join us  

ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, आमचं वकिलपत्र दुसऱ्यानं घेण्याचं कारण नाही; अजितदादा संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 2:48 PM

तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षाबद्दल जे सांगायचं ते सांगा, आमची भूमिका मांडण्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत, अजित पवार यांचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघालं होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. पण, आता स्वतः अजित पवार यांनीच या चर्चांना पूर्णविराम देत आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचं ते म्हणाले. याशिवाय त्यांनी आपण आपली भूमिका मांडण्यास खंबीर असल्याचंही म्हटलं.

“आमच्याबद्दल काही बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोकं करत असतील. माझ्या पक्षात माझ्याबद्दल आकस असणारं कोणी नाही. परंतु पक्षाच्या बाहेरचे असू शकतात,” असं अजित पवार म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.

“काही बाहेरच्या पक्षातील प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखं झालंय. त्यांना कोणी अधिकार दिला आहे. पक्षाची बैठक होणार तेव्हा मी यावर चर्चा करणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षाबद्दल जे सांगायचं ते सांगा. ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. पण आम्हाला कोट करून बोलू नका. आम्ही स्पष्टपणे आमची भूमिका मांडण्यास तयार आहोत. आमचं वकिलपत्र दुसऱ्यानं घेण्याचं कारण नाही. ज्यांनी त्यांची त्यांची भूमिका मांडावी. आमची भूमिका मांडण्यासाठी आमच्या पक्षाचा प्रवक्ता, नेते मजबूत आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

मी राष्ट्रवादीतच“आमची भूमिका मांडण्यासाठी आमचे पक्षाचे नेते आहेत. त्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, मी राष्ट्रवादीत पवार साहेबांसोबतच आहे,” असं अजित पवार म्हणाले.

आमदार मुंबईला आले म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट असतेच असं नाही. आमदार त्यांच्या कामासाठी मुंबईत येतात. ही नेहमीची पद्धत आहे, यात वेगळा अर्थ काढू नका. त्यांची कामं होती, ती कामं घेऊन ते आले होते. कारण नसताना अशा बातम्या आल्या तर आमच्या मित्रपक्षातही चुकीचा संदेश जातो. काहीजण उद्धव ठाकरेंना विचारतात, पृथ्वीराज चव्हाणांना विचारतात, मी त्यांना सर्व माहिती दिलीये. मी स्पष्टपणे सांगतोय, या गोष्टीला पूर्णविराम लावा. अशाप्रकारच्या बातम्या थांबवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस