Join us

Gujrat Election Result 2022: “जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना आपलं राज्य टिकवता आलं नाही”; अजितदादांचा JPना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 10:39 PM

Gujrat Election Result 2022: हिमाचल प्रदेशमधील पराभव हा नामुष्की आणि कमीपणा नाही का? अशी विचारणा अजित पवार यांनी केली आहे.

Gujrat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय झाला असून, सातव्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. गुजरातमध्ये भाजपाने सर्वाधिक १५६ जागा मिळवत दमदार कामगिरी केली आहे. तर, काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकीकडे भाजपचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत असताना दुसरीकडे विरोधकांनी हिमाचल प्रदेशमधील पराभवावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना टोला लगावला आहे. जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना आपले राज्य टिकवता आले नाही, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी केली आहे. 

जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना आपले राज्य टिकवता आले नाही. हिमाचल प्रदेश हे नड्डा यांचे राज्य असून, ते तेथून भाजपचे अध्यक्षपद भूषवतात. ही त्यांची नामुष्की आणि कमीपणा नाही का?. मात्र, भाजपने गुजरातमध्ये जोर लावला होता. सर्वांत जास्त बहुमत भाजपला यंदा मिळाले, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

कर्नाटकातील मराठी भाषिकांवर अन्याय

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी बोलताना, महाविकास आघाडीच्या खासदारांनी सीमावादावरून गृहमंत्री अमित शाहांना पत्र दिले आहे. पण, एकीकडे बोम्मई हे शांततेच आवाहन करून परत भडकवण्याचे काम करतात. कर्नाटकातील मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात येत आहे. ‘कन्नड रक्षण वेदिका’ संघटनेकडून कर्नाटकात ‘हम करेसो कायदा’ असे वागले जाते, असा आरोप अजित पवारांनी केला.

दरम्यान, गुजरात निवडणूक निकालाबाबत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते इथेही भरघोस घोषणा करतील अशी अपेक्षा. आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करुन भाजपाचा फायदा घडवून आणला हे स्पष्ट आहे. ज्यांचे त्यांचे राजकारण सोयीनुसार चालत असते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :गुजरात विधानसभा निवडणूक 2022अजित पवारजगत प्रकाश नड्डा