Join us

'नक्की काही तरी काळंबेरं आहे, जपून राहा'; अजित पवारांचा सल्ला, नेमकं काय म्हणाले पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 1:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मुंबई- विधानसभेत भाजपा आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजपा-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. दरम्यान, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शाह फारूख अन्वर मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. 

भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी मी अनेकदा देवेंद्र फडणवीसांना इथे भाषण करताना पाहिलं. पण आज तो उत्साह दिसत नव्हता, असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला. तसेच १०६ आमदार असलेल्या पक्षाचा आमदार मुख्यमंत्री नाही. ४० आमदार असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. यात नक्की काही तरी काळंबेरं आहे, त्यामुळे जपून राहा, असा इशारा देखील अजित पवारांनी यावेळी दिला. 

जे विधीमंडळात आमदार निवडून आले, त्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. अडीच वर्ष झाली, अडीच वर्ष शिल्लक आहेत. अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यंमत्री पण झाले आणि विरोधी पक्षनेतेही झाले. कोणतंही पद ठेवलं नाही. सर्व महत्त्वाची पदं ही त्यांनी भूषवली, असं म्हणत अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. 

दरम्यान, भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मला सर्वोच्च स्थानावर बसवलं त्या पक्षाने मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तरी बसलो असतो. तसेच एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने मी उभा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

एकनाथ शिंदे यांची कारकीर्द यशस्वी होईलच, पण ती अधिक यशस्वी कशी होईल हा प्रयत्न मी करणार आहे. त्यांच्यात माझ्यात कधीही दुरावा, पॉवर स्ट्रगल, कुरघोडीचं राजकारण दिसणार नाही. कारण कधी आम्ही सोबत होतो, कधी वेगळ्या बाकांवर होतो आमच्यातली मैत्री कायम राहिली, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार-

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिलं. त्यांच्या पत्राला उत्तर द्यायचा मी विचार केला, पण मला शब्द सुचले नाहीत. त्यामुळे फोन करून राज ठाकरेंचे आभार मानले. त्यांची भेटही घेणार आहे. आपण सगळे राजकीय विरोधक, आपण शत्रू नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवारमहाराष्ट्र सरकार