Ajit Pawar: एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर एका संयुक्त पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. जायचे म्हटले तर कसेही जाता येते. पण हिंमत पाहिजे, असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला.
शनिवारी १७ तारखेचा मोर्चा ठरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांची बेताल वक्तव्य चालली आहेत. याचा निषेध केला जाणार आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्र सरकारने हटविले तरीही मोर्चा निघणारच आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारला कानपिचक्या दिल्या.
तुम्ही ‘आरे’ला ‘का रे’ उत्तर दिलेत का
छगन भुजबळ वेषभुषा करून गेले होते. जायचे म्हटले तर कसेही जाता येते. पण हिंमत पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. शिंदे सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली, तेव्हा आमच्याकडून दोन मंत्री जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मंत्रिमंडळ सर्वोच्च आहे ना, शासन आहे ना, तुम्ही चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांचे नाव घेतले होते ना, अशी प्रश्नांची सरबत्ती करत आता तुम्हीच बॅकफूटवर आलात. बोम्मई यांचे विधान आल्यानंतर तुम्ही ‘आरे’ला ‘का रे’ उत्तर दिलेत का, अशी विचारणा करत विरोधी पक्षांनी वेळोवेळी आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नांदेडमधील देगलूरच्या लोकांनी आम्हाला तेलंगणात जायचे असे कधी सांगितले नव्हते. आता ती गावे बोलायला लागलीत. सांगली, सोलापूरची लोकं बोलायला लागलीत. गुजरातच्या सीमेवरील लोकंही बोलायला लागलीत. सीमेवरील गावांनी अशी इच्छा व्यक्त केली जात नव्हती. सांगतील जयंत पाटील यांनी तरतूद केली होती. ती या सरकारने थांबविली. नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ यांनी तरतूद केली होती ही या सरकारने थांबविली, असा आरोप अजित पवार यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"