मुंबई- हर हर महादेव' या मराठी चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ सोमवारी रात्री १० च्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शहरातील विवियाना मॉल येथील शो बंद पडला. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले तसेच कोण जितेंद्र आव्हाड? असा सवाल केल्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. आव्हाडांच्या या भूमिकेनंतर मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्व प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्हे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
ठाण्यात काल चित्रपट पाहाण्यास गेलेल्या एका प्रेक्षकालाही मारहाण करण्यात आली. मी या मारहाणीचं कधीच समर्थन करणार नाही. इतरांची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी करावी, ही माझी भूमिका असते, असं अमोल कोल्हे म्हणाले. तसेच छत्रपती शिवजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहेत आणि हे केवळ म्हणून चालणार नाही, तर त्यांचा योग्य इतिहास सर्वांसमोर मांडला गेला पाहिजे, असा सल्लाही अमोल कोल्हे यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना दिला आहे.
प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्त्यांविरुद्ध ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम, महादेव कुंभार, भरत चौधरी आदींनी भेट देऊन पाहणी केली. महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शेट्टी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. यातील आरोपींना नोटीस देण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे 'हर हर महादेव' हा चित्रपट विवियाना मॉलमध्ये पुन्हा सुरु करण्यात आला. अविनाश जाधव यांनी यावेळी स्वत: चित्रपटगृहात बसून संपूर्ण चित्रपट पाहिला. तसेच मी चित्रपट पाहतोय. माझ्यासह अनेक प्रेक्षक देखील उपस्थित आहे. त्यामुळे चित्रपट बंद करुन दाखवाच, असा इशाराही अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.
मनसेकडून आज 'मोफत शो'चे आयोजन-
सोमवारी रात्री सदर प्रकार घडला त्या ठाण्यातील विवियाना मॉलच्या चित्रपट गृहातच 'हर हर महादेव' या चित्रपटाच्या 'मोफत शो'चे आयोजन केले आहे. आज सायंकाळी ६.१५ वाजता हा चित्रपट प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे. एकप्रकारे अविनाश जाधव यांनी जितेंद्र आव्हाडांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आज पुन्हा ठाण्यात राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.