मुंबई: राज्यसभेच्या अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले. भाजपच्या पियूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. एकीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचा फार मोठा विजय म्हणण्याचे कारण नाही. ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी ठरणार असल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सोडले आहे.
अखेर रडीचा डाव यशस्वी झाला. अपक्षातील काही मतदारांवर यंत्रणा, धाकदपट शाहिने कपटी राजकारण करण्यात भाजप यशस्वी झाली असली तरीही त्यांनी एक लक्षात ठेवावे, मविआची मत सुरक्षित आहेत. त्यात फुट नाही. तुमच्या केंद्रीय यंत्रणा तुमच्या कामी आल्या. २०२४ ला हा हिशेब चुकता करु, असे अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच शिवसेनेच्या संजय पवारांना पहिल्या फेरीत सर्वात जास्त पसंदीची मते आहेत. त्यामुळे भाजपचा फार मोठा विजय म्हणण्याचे कारण नाही. काही अपक्षाच्या जोरावर दगा फटका करणारी ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी ठरणार, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी हल्लाबोल केला.
आम्हाला शब्द देऊन दगाबाजी केली
राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीवरून रंगलेले राजकीय नाट्य आणि शिवसेना उमेदवाराचा झालेला पराभव संजय राऊत यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजप आणि अपक्षांवर आगपाखड केली. आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. अपक्ष उमेदवारांनी आम्हाला शब्द देऊन मतदान केलं नाही. सहा सात मते आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मते मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच संजय पवार यांच्या पराभवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर दबाव टाकून भाजपने विजय मिळविल्याची टीका केली आहे. भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मते आहेत. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे. पण भाजपचा दणदणीत विजय झाला, हे चित्र साफ झूट आहे. भाजपने माझे मत बाद करायला लावले, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय? असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर प्रहार केला.