मुंबई- शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार आले. यानंतर नुकताच शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील गडचिरोली दौऱ्यावर असताना शिंदे गटातील अनेक आमदार त्यांच्या संपर्कात होते, असा मोठा दावा राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तार होत नाहीय. आम्हाला मंत्रिपद मिळेल, असं वाटत नाहीय. त्यामुळे आम्ही शिंदे-फडणवीस सरकार सोडून येण्याच्या मनस्थितीत आहोत, असे जवळपास १२ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आले आहेत. माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे त्यांची नोंद आहे, असंही अमोल मिटकरी यांनी यावेळी सांगितलं. मात्र जयंत पाटलांना अमोल मिटकरींच्या या विधानवर विचारले असता, मला याबाबत काही माहिती नसल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं. शिंदे गटातील १५ ते १६ आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये उद्रेकता वाढली आहे. आपण उगीचच मातोश्री आणि उद्धव साहेबांना सोडलं, अशी भावना आमदारांच्या मनात येत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता.