मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. संबोधनादरम्यान राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाला शिंदे गटाची स्क्रिप्ट म्हणत निशाणा साधला.
“राज ठाकरेंनी सभा घेतली त्यात शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट होती. राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे भाजपच्या कानाखाली आवाज काढणारं होतं. भाजप आजपर्यंत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळ्या गोष्टी साध्य करत होतं. पण आता भाजपचा भ्रमनिरास झाला असेल. निश्चितच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते राज ठाकरेंच्या भाषणामुळे अस्वस्थ झाले असतील असं माझं मत आहे,” असे मिटकरी म्हणाले.
“राज ठाकरेंनी राज्यपालांना खडेबोल सुनावले. तसेच शिंदे गटाचा एक वाचळवीर मंत्री अब्दुल सत्तार यांचीही कानउघणी केली. त्यामुळे भाषणातून बऱ्यापैकी भाजपच्या तोंडात हाणलं आहे,” असंही ते म्हणाले.
राज्यपालांवर राज ठाकरेंचा निशाणा“उद्योगधंद्यांवर त्या दिवशी धोतर बोललं. वय काय, बोलतायत काय? काय चाललंय? राज्यपाल पदावर बसलायत म्हणून मान राखतोय. महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. गुजराती मारवाडी परत गेले तर काय होईल असं महिन्याभरापूर्वी म्हणाले. पहिले त्या समाजाला विचारा आपलं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुम्ही उद्योगपती, व्यापारी आहात तर आपल्या राज्यात का नाही उद्योग थाटले. याचं कारण तिकडे महाराष्ट्रासारखी सुपिक जमीन नव्हती,” असंही ते म्हणाले. महाराष्ट्र समृद्ध होताच, हे आम्हाला कोश्यारींकडून ऐकायचं नाही. आज त्या लोकांना सांगितलं तर ते आपल्या राज्यात जातील का? सभोवतालचं वातावरण आहे, परदेशातील कोणताही व्यवसाय आणायचा असेल तर त्याचं प्राधान्य महाराष्ट्रच असतो, असंही ते म्हणाले.