Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. विरोधकांकडून शिंदे गटावर सातत्याने पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी अतिशय मिश्किल शब्दांत टिपण्णी केली आहे. मातोश्रीवर गेलो होतो, उद्धव ठाकरेंनी मला एक खोका दिला, असा अप्रत्यक्ष खोचक टोला अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला उद्देशून केला.
अमोल मिटकरी यांनी मातोश्रीवर सहकुटुंब शिवसेना पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. यानंतर मातोश्रीबाहेर माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर खोचक शब्दांत निशाणा साधला. मला मातोश्रीवर खोका मिळाला. उद्धव ठाकरे यांनी एक खोका दिला. त्यात त्यांनी मला एक चॉकलेट दिले, असे उपरोधिक वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले.
ज्यांनी खोके घेतले आहेत, त्यांनी उघडपणे सांगावे
मातोश्रीवरून मला एक खोका मिळालाय. पण हा गोडवा वाढवणारा खोका आहे. ज्यांनी खोके घेतले आहेत, त्यांनी उघडपणे सांगावे, असा चिमटा अमोल मिटकरींनी लगावला. दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त करत भाजपवर पलटवार केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले वक्तव्य हे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असून सरकारने याची तात्काळ दखल घेऊन बावनकुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा हा महाराष्ट्र आहे हे सिद्ध करावे, असे अमोल मिटकरींनी म्हटले.
दरम्यान, NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न सोडून दिले पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा करणारे भोंदूबाबा कोण आहे ते सर्व देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे. एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की, सुटत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे. आता फक्त काँग्रेसचे संविधान त्यांनी स्वीकारायचे बाकी आहे. आपल्या पक्षाचे संविधान म्हणून काँग्रसेच्या संविधानाची नक्कल करून निवडणूक आयोगाला सादर करावी, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"