'लवकर या अन् शिव्या घाला, असं वातावरण पुन्हा परत मिळणार नाही', जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 12:25 PM2023-04-03T12:25:52+5:302023-04-03T12:27:13+5:30
धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
मुंबई: बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री आणि कालिचरण महाराज यांनी केलेल्या विधानांवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांबाबत केले आहे. कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.
धीरेंद्र शास्त्री यांच्या या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत वादग्रस्त विधान करणारे आणि सरकारवर निशाणा साधला आहे. कुणालाही शिव्या घाला महापुरुषांना घाला, श्रद्धा स्थानांना घाला ….. असं वातावरण परत मिळणार नाही. यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही याची खात्री आणि शाश्वती आहे. या लवकर या..., असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलं आहे.
जाहीर आमंत्रण!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2023
या... महाराष्ट्रात कोणालाही शिव्या द्या.
छत्रपती शिवाजी महाराजांना द्या...
जिजाऊ मातेला द्या
महात्मा गांधींना द्या...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना द्या...
महात्मा फुलेंना द्या...
क्रांतीज्योती सावित्री माई ला द्या
छत्रपती शाहू महाराजांना द्या...
साई बाबांना द्या...… pic.twitter.com/zaiqsab89b
दरम्यान, साई बाबा संत असू शकतात. फकिर असू शकतात. पण ते देव होऊ शकत नाही, असे विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले असून, जितके तुम्ही नथुराम गोडसे यांच्याबद्दल वाचणार तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींच्या बाबत केले ते योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता, असे वक्तव्य कालिचरण महाराजांनी केले आहे. बागेश्वर बाबा आणि कालिचरण महाराजांच्या विधानांनंतर पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.