अनिल देशमुख यांना भारतभर फिरण्याची परवानगी; सत्र न्यायालयाकडून अर्ज मंजूर
By रतींद्र नाईक | Published: November 2, 2023 10:37 PM2023-11-02T22:37:11+5:302023-11-02T22:37:24+5:30
उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना महाराष्ट्राबाहेर जायचे असेल तर सत्र न्यायालयाची परवानगी घ्यावी अशी अट घातली होती.
मुंबई : मनी लॉण्ड्रिग प्रकरणी ११ महिने तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर पडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिल देशमुख यांनी भारतात फिरण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायधीश राहुल रोकडे यांनी देशमुख यांना तीन महिन्याची मुदत देत गुरुवारी त्यांचा अर्ज मंजूर केला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये खंडणी वसुलीचा गंभीर आरोप केला होता. मनी लॉण्ड्रिग प्रकरणी ईडीने देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच नोव्हेंबर २०२१ साली अटक केली त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अटी शर्तीसह देशमुख यांचा जामीन १२ डिसेंबर २०२२ रोजी मंजूर केला.
उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना महाराष्ट्राबाहेर जायचे असेल तर सत्र न्यायालयाची परवानगी घ्यावी अशी अट घातली होती. त्यामुळे मतदार संघात फिरण्यासाठी तसेच दिल्ली येथे वकिलांची भेट घेण्यासाठी वारंवार महाराष्ट्राबाहेर जावे लागत असल्याने अनिल देशमुख यांनी गुरुवारी सत्र न्यायालयात अर्ज केला होता त्यावेळी देशमुख स्वतः न्यायालयात जातीने हजर होते. न्यायधीशांनी हा अर्ज मंजूर करत देशमुख यांना महाराष्ट्राबाहेर फिरण्याची परवानगी दिली.