Join us

“राज्यसभा नाही, विधान परिषदेसाठी तरी मतदान करु द्या”; देशमुख-मलिक पुन्हा हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 3:16 PM

अलीकडेच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली होती.

मुंबई: राज्यसभेची रणधुमाळी शमते ना शमते तोच आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2022) राजकारण तापताना दिसत आहे. यातच राज्यसभा निवडणुकीत मतदानाची परवानगी मागणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या पदरी निराशाच पडली होती. मात्र, विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांनी मतदानाची परवानगी मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आता विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यसभा निवडणुकीत या दोघांनाही मतदान करता आले नव्हते. विधान परिषद निवडणुकीतील मतदानाबाबत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेतली जाणार असून, मलिक आणि देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

२० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक

राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता आगामी २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या निकालानंतर नऊ दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीत चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणुकही अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्ह आहेत.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी १० जागांसाठी ११ जण रिंगणात असल्याने राज्यसभेप्रमाणेच रस्सीखेच बघायला मिळणार आहे. शिवसेनेने सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोघांनाही संधी नाकारत सचिन अहिर व नंदुरबारचे जुने शिवसैनिक आमशा पाडवी यांना संधी दिली आहे. भाजपने पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा संधी नाकारली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेले राम शिंदे यांचे पुनर्वसन केले. राष्ट्रवादीकडून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या दोन मुंबईकर नेत्यांना मैदानात उतरविले आहे.  

टॅग्स :विधान परिषद निवडणूकमुंबई हायकोर्टनवाब मलिकअनिल देशमुख