Anil Deshmukh: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख भाजपात येण्यास इच्छुक होते; 'या' भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:28 PM2023-02-13T14:28:17+5:302023-02-13T14:34:05+5:30
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये येण्यास इच्छुक होते.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये येण्यास इच्छुक होते. त्यांनी या संदर्भात कितीतरी वेळा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला होता, असा गौप्यस्फोट भाजप नेते मंत्री गिरीष महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केला.
'अनिल देशमुख भाजपमध्ये येण्यास इच्छुक होते, सुदैवाने ते राष्ट्रवादीमधून निवडून आले. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांअगोदर आमच्या समोर प्रस्ताव ठेवला होता, असंही मंत्री गिरीष महाजन म्हणाले. महाजन यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
'तुरुंगात असताना मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑफर मिळाली होती. जर मी ती ऑफर तेव्हाच स्विकारली असती तर महाविकास आघाडी सरकार तेव्हाच कोसळले असते, असा गौप्यस्फोट माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. यानंतर या विधानाला प्रत्युत्तर देताना मंत्री गिरीष महाजन यांनी आमदार देशमुख भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते असा दावा केला आहे.
...तर राहुल गांधींची खासदारकी जाणार, भाजपा खासदाराचा दावा; नियम काय सांगतो वाचा!
आमदार अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात १३ महिने तुरुंगात होते आणि जामिनावर बाहेर आले आहेत. देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती आणि २८ डिसेंबर रोजी त्यांची जामिनावर सुटका झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे जूनमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या सरकारवरही अनिल देशमुख यांनी आरोप केले. ईडीने कारवाईची धमकी दिल्याने शिवसेनेच्या ४० आमदारांनी मूळ पक्ष सोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. मला खोट्या आरोपाखाली १४ महिने तुरुंगवास भोगावा लागला. मात्र, मी कधीही हार मानली नाही, असंही अनिल देशमुख म्हणाले.