शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीचे नेते पोहचले; 'सिल्वर ओक' बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 10:05 AM2019-09-27T10:05:19+5:302019-09-27T10:05:35+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्ष कार्यालयाबाहेर आणि शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे
मुंबई - शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ईडीची कोणतीही नोटीस न येता शरद पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुंबईत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. कलम 144 लागू करुन पोलिसांनी ईडी कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्ष कार्यालयाबाहेर आणि शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. सुडबुद्धीच्या भावनेतून सरकारकडून शरद पवारांना बदनाम करण्यात येत आहे असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते जमले आहेत तसेच कार्यकर्त्यांची रिघही लागली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही पवारांशी संवाद साधला आहे. मात्र कार्यकर्त्यांची भावना संतप्त आहे, राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये, हीच शरद पवारांची इच्छा आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. कायदा सुव्यवस्था विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी घराबाहेर पडू नये अशी विनंती पोलिसांकडून शरद पवारांना करण्यात आली आहे.
आज ईडी कार्यालयात शरद पवार स्वत:हून हजर राहणार असून कर नाही तर डर कशाला, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षिण मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. शरद पवारांना विनाकारण आरोप करुन नाव बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. पवारांना जो प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे सुडाचं राजकारण सुरु आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात कुठेही शरद पवार गेले तरी लाखो लोकं त्यांचे स्वागत करत आहे. त्यातून ही कारवाई केली. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. राष्ट्रवादी शिस्तबद्ध पक्ष आहे, कोणताही गोंधळ न करता निषेध नोंदवावा, महाराष्ट्रभर लोकांमध्ये संतापाची भावना आहे. लाखो कार्यकर्ते मुंबईत येण्याचा प्रयत्न करतायेत. कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावं, कुठेही गोंधळ करु नये असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.