'नागपुरात रोज होतं ते नाशिकमध्ये झालं, त्यामुळे तुम्हाला काहीच वाटणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 08:27 AM2019-06-20T08:27:55+5:302019-06-20T08:28:37+5:30
पानसरे, दाभोळकर यांचे मारेकरी का सापडत नाही असा सवाल हायकोर्ट सरकारला विचारत आहे. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे.
मुंबई - नाशिकमध्ये दिवसाढवळ्या मुथूट फायनान्सवर दरोडा पडला. त्यामध्ये काहींचा जीव गेला. असं नागपुरात होतं. त्यामुळे तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही असा टोला छगन भुजबळ यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांना लगावला.
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी सरकारच्या अनेक योजनांवर आणि चुकीच्या कामांवर टीका केली. राज्यात विकास होताना कायदा व सुव्यवस्था चांगली आहे का की दिवसाढवळया हत्या होतात हे पाहिले जाते त्याचा परिणाम होतो पानसरे, दाभोळकर यांचे मारेकरी का सापडत नाही असा सवाल हायकोर्ट सरकारला विचारत आहे. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्याचे नाव खराब होते असा आरोप आमदार छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर लावला.
तसेच राज्यपाल अभिभाषणात जे स्वप्न दाखवत आहेत त्यामध्ये सरकार कमी पडत आहे त्याबद्दलची नाराजी भुजबळांनी व्यक्त केली. राज्यावर ३ लाख कोटीचे कर्ज आहे. आणि ५ वर्षात त्यात २ कोटीने कर्ज वाढले तरीही सरकार राज्याचे उत्पन्न वाढले सांगत आहे मग सरकार कर्ज का घेते हे कसं शक्य आहे असा सवाल करतानाच खूप उत्पन्न वाढलं, खूप कर्ज घ्यावं लागलं आणि मग खूप व्याज भरावं लागलं असा चिमटाही आमदार छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला काढला.
राज्यातील आरोग्य यंत्रणा डबघाईला आली असल्याचे सांगतानाच दवाखान्यात डॉक्टरच नसल्याचा मुद्दा लावून धरला. शिवाय प्रत्येक खात्यात अनेक पदे रिक्त आहेत ती कधी भरणार आहात असा सवालही भुजबळांनी केला. तुम्ही ज्या योजना राबवता त्याची फलश्रुती हवी असेल तर ही रिक्त पदे भरणे गरजेची असल्याचेही सांगितले. दरम्यान राज्यात रस्ते मोठमोठे होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पासाठी २५ हजार कोटीची तरतुद करण्यात आली आहे. मोठे रस्ते झाले तर टोल लागणारच त्याशिवाय रस्ते होणार नाहीत. परंतु ८०० हजार कोटी टोलवाल्यांना देता मग रस्ते खराब कसे होतात असा संतप्त सवालही आमदार छगन भुजबळ यांनी केला.