कोरोनाची मीटिंग चाललीय, तर कोरोनावर बोलावं; छगन भुजबळ यांची नरेंद्र मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 09:17 AM2022-04-30T09:17:11+5:302022-04-30T09:18:07+5:30
मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटचामुद्दा उपस्थित केला. त्यावरून राज्यात वाद-प्रतिवाद सुरू आहे. पेट्रोल-डिझेलवरील करांमध्ये कपात न करणाऱ्या बिगर-भाजपशासित राज्य सरकारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. या राज्यांमध्ये इंधन दर अधिक आहेत. सहा महिने वाया गेले पण, आता तरी करकपात करून लोकांना दिलासा द्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या संदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या बैठकीसंदर्भात वक्तव्य केलं आहे. ३८ टक्के भारत सरकारच्या तिजोरीमध्ये भर घालतो. त्यात आम्हाला किती परत मिळतोय चार ते पाच टक्के, असं छगन भुजबळ म्हणाले.
कोरोनाची मिटींग चाललीय तर कोरोनावर बोलावं. मुख्यमंत्र्यांना सांगितलं असतं की मी डिझेल पेट्रोलवर बोलाणार आहे. ते डिझेल पेट्रोलच्या तयारीत गेले असते, असंही भुजबळ म्हणाले. बरं, त्या मिटींगमध्ये फक्त ते बोलणार दुसरं कोणी बोलायचं नाही. ते बोलणार आणि ते मीडियात येणार तेवढच, अशा टोलाही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
मोदींनी बैठकीत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांचा उल्लेख केला. "केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आणि राज्यांनाही व्हॅट कमी करण्यास सांगितलं होतं. मात्र, अनेक राज्यांनी असं केलं नाही."
"मी कुणावरही टीका करत नाहीये, तर तुमच्या राज्यातील लोकांच्या भल्यासाठी प्रार्थना करतोय. या राज्यांनी केंद्राची सूचना ऐकली नाही. ज्यांचं थेट ओझं सर्वसामान्यावर पडत आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे. जे नोव्हेंबर करायचं होतं, तो व्हॅट आता कमी करून राज्यांना लाभ मिळू द्या," असं मोदी म्हणाले होते.