मुंबई- मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधानसबेत एका प्रश्नावरुन फिरकी घेतली.
सध्या पालघर जिल्ह्यातील बालकांमधील हत्तीरोगाचा प्रश्न गाजत आहे. याचपार्श्वभूमीवर विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सरकारला घेरण्यास सुरुवात केली. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माहिती घेऊन उत्तर देतो, असं म्हटलं होतं. त्यानूसर आज पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगचा वाढता प्रभाव पाहता, शासनाने काय उपाययोजना केली?, यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले व डास घनता काढली, असे उत्तर दिले.
शासनाच्या या उत्तरावर आज छगन भुजबळ यांनी फिरकी घेतली. एकूण किती डास पकडले?, डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले?, यात नर डास जास्त धोकादायक आहे. की मादी डास धोकादायक आहे?, डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का?, याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का?, असे गमतीशीर प्रश्न छगन भुजबळांनी विचारले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ पदरी होणार-
माजी आमदार विनायक मेटेंच्या अपघाताला एक्स्प्रेस वेवरील अवजड वाहतूक जबाबदार आहे. ट्रक चालकांना एका लाईनमध्ये जाण्यास सांगितले तरी ते जाणार नाहीत. त्यांच्या बाजुने जाण्यास छोट्या वाहनांचे चालक घाबरतात. यामुळे जर एक्स्प्रेस वेचा विस्तार केला तर ट्रक चालकांना दोन लेन देता येतील. कारण त्यांनाही ओव्हरटेक मारावी लागते. यामुळे चौथ्या लेनचा विस्तार सरकारने करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांच्या गाडीचा चालक सारखा स्टेटमेंट बदलतोय. यामुळे घातपात झाल्याचा संशय तयार होतोय. यावर सीआयडी चौकशी सुरु केली आहे. मेटेंच्या चालकाने ११२ नंबरवर फोन केल्याचे म्हटलेय. पण त्याने केला की नाही हे समजलेले नाही. या प्रकरणी आणखी एक अधिकारी नियुक्त केला जाईल. अजित पवारांनी महत्वाचा मुद्दा मांडला. एक्स्प्रेस वेवर जी काही कोंडी होतेय, त्यावर तोडगा काढू. चौथ्या लेनचे कामही करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राजकीय नेत्यांना प्रवास करावा लागतो. त्यांनी रात्रीचा प्रवास टाळावा, असे आवाहनही फडणवीस यांनी नेत्यांना केले.