'मला एक मेसेज आलाय'; छगन भुजबळ सभागृहात मध्येच उठले, नेमकं काय घडलं पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 01:24 PM2022-07-03T13:24:03+5:302022-07-03T13:25:42+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मला एक मेसेज आला असल्याचं सांगितले आणि तो मेसेज त्यांनी सभागृहात वाचून दाखवला.
मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत.
शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त १६४ मतं मिळाली. तर राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक विधानसभा सदस्य राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करत होते.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करण्यासाठी उठले असता, तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मला एक मेसेज आला असल्याचं सांगितले आणि तो मेसेज त्यांनी सभागृहात वाचून दाखवला. छगन भुजबळांच्या या मेसेज नंतर सभागृहात एकच हसा पिकला.
विश्वनाथजी आनंद यांनी सगळ्या दिग्गज बुद्धिबळात हरवलं आहे. त्यामुळे ते मोठे खेळाडू आहेत. मात्र त्यांना जेव्हा विचारलं की, तुम्ही बुद्धिबळाचा डाव खेळाल का?, तर आनंद विश्वनाथजी म्हणाले की, मी आता खेळू शकत नाही. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकच डाव टाकतात की त्यानंतर कोणत्या सोंगट्या कुठे जातात हेच कळत नाही, म्हणून मी काही खेळू शकत नाही, असं म्हणत छगन भुजबळ यांनी भाजपाला टोला लगावला.
दरम्यान, आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे. आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्यात विरोधकांकडून सत्ताधारीत जाण्याच्या घडल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली. माझ्यासह ८ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. मला ५० आमदारांनी साथ दिली. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो. कुणावरची जोरजबरदस्तीचा प्रयत्न झाला नाही. ज्याला वाटलं त्यांना विशेष विमानानं परत पाठवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.