Join us

Chhagan Bhujbal दीड तास वेटिंग, नंतर सविस्तर मीटिंग; छगन भुजबळांनी सांगितला पवारांसोबतच्या चर्चेचा तपशील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 1:05 PM

शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर भुजबळ यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि भेटीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली आहे.

Sharad Pawar Chhagan Bhujbal Meeting ( Marathi News ) : "मी कोणतीही अपॉइंटमेंट न घेता आज पवारसाहेबांच्या भेटीसाठी गेलो होतो. तब्ब्येत बरी नसल्याने ते झोपलेले होते. त्यामुळे मी एक-दीड तास तिथे थांबलो. त्यानंतर ते उठले आणि आमची भेट झाली. यावेळी मी त्यांना सांगितलं की, मी इथं कोणत्याही पक्षाचा नेता म्हणून किंवा आमदार, मंत्री म्हणून आलेलो नाही. पण राज्यात आरक्षणावरून सध्या काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक स्थिती आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही आपली भूमिका मांडली पाहिजे, ही विनंती करण्यासाठी त्यांना भेटायला गेलो होतो," अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.

शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेलेले छगन भुजबळ यांना तब्बल दीड तासांच्या प्रतीक्षेनंतर भेटीची वेळ मिळाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर भुजबळ यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भेटीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली आहे.

भेटीत नेमकं काय घडलं?

"ओबीसी समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं काम तुम्ही केलं होतं. मात्र आता राज्यात काही ठिकाणी तणावाची स्थिती आहे. मराठा समाजाच्या व्यक्तीच्या हॉटेलमध्ये ओबीसी समाजातील लोक जात नाहीत. जिथं ओबीसी समाजातील कोणाचं दुकान असेल तर तिथं मराठा समाजातील लोक जात नाहीत. ही स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा," असं आवाहन मी शरद पवार यांना केलं. त्यावर ते म्हणाले की, "सरकारच्या लोकांनी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना काय आश्वासन देण्यात आलं, याबाबतची माहिती आमच्याकडे नाही. तसंच लक्ष्मण हाके यांचंही उपोषण कोणत्या आश्वासनावर सोडण्यात आलं, याबाबत आम्हाला कल्पना नाही. मात्र मी पुढील एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्‍यांशी यावर चर्चा करतो आणि यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतो," असा शब्द पवार यांनी आपल्याला दिल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसंच महाराष्ट्रातील सामाजिक तणाव दूर करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असून यासाठी मी गरज पडल्यास काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासही तयार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आधी वेळ न घेता भेटीसाठी थेट सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेल्याने छगन भुजबळ यांना दीड तास वेटिंगवर थांबावं लागलं. शरद पवार हे तयार झाल्यानंतर भुजबळ यांना वेळ देण्यात आली. 

भुजबळांनी शरद पवारांवर काल काय टीका केली होती? मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वी सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. या निर्णयामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत छगन भुजबळ यांनी काल बारामतीतील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली. "व्ही. पी. सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली. त्यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जयजयकार केला. मात्र आता आरक्षणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झालेला असताना अपेक्षा ही होती की, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांनी तिथे यायला हवं होतं. मात्र असं सांगितलं जातं की या बैठकीला सर्व नेते येणार होते, पण सायंकाळी ५ वाजता बारामतीतून कोणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला," असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. 

टॅग्स :शरद पवारछगन भुजबळमराठा आरक्षणओबीसी आरक्षणराष्ट्रवादी काँग्रेस