मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरेमधील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देण्यात आली. यानंतर वृक्षतोडिविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले होते. या निर्णयाचे स्वागत होत असताना उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नाणार रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नशीब दहशतवादी कसाब याला फाशी झाली, नाहीतर त्याच्यावरचे गुन्हेही या महाराष्ट्र सरकारने कदाचित मागे घेतले असते असं ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी विविध आंदोलनकर्त्यांची तुलना मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील दहशतवादी कसाब यांच्यासोबत केल्याने अवधूत वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
अवधूत वाघ यांच्या विधानावर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून वाघासारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहे. आपल्या हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी करताना यांना लाजा वाटत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या नेतृत्वाने या वाचाळवीराच्या नीच वक्तव्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची ताबडतोब माफी मागावी असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
गेल्या पाच वर्षात दाखल करण्यात आलेले सर्व अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जाईल, अशी ग्वाही देतानाच मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबतही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितलं होतं. तसेच भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी देखील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी देखील ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचे म्हटले आहे. ''भीमा कोरेगाव दंगलीत सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांविरुद्ध तत्कालीन भाजप सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. भाजप सरकारच्या अत्याचारात बळी ठरलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.