Eknath Khadse Replied PM Modi: विरोधकांची INDIA आघाडी आणि सत्ताधारी NDA मध्ये मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी यांनी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. यावेळी शिवसेनेने युती तोडली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मात्र, नरेंद्र मोदी जे म्हणाले ते अर्धसत्य आहे, पूर्ण सत्य नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
मीडियाशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी खासदारांना जे सांगितले ते अर्धसत्य आहे. मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. त्यामुळे भाजपचे सरकार येईल असा आम्हाला विश्वास होता. भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला होता. त्यामुळे अनेकांना तिकिटे देणे कठीण होते. म्हणून आमच्यात चर्चा सुरू झाली. त्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. निवडणुकीच्या दोन अडीच महिन्याआधीच युती तोडण्याचा आमचा निर्णय झाला होता. त्यानंतर भाजपने युती तोडली, असा दावा आता एकनाथ खडसे यांनी केला आहे.
युती तुटल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगायला हवे होते, पण मला पुढे करण्यात आले
आम्ही पक्षात चर्चा करूनच निर्णय घेतला. पक्षाने एकमताने निर्णय घेतला होता. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस आणि मीही होतो. देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते. युती तोडायचे हे कुणी आणि कसे सांगावे? यावर आमच्यात चर्चा झाली. मला तातडीने मुंबईला बोलावले. देवेंद्र फडणवीस यांनीच युती तोडण्याची घोषणा करायला हवी होती. पण ती जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. मी उद्धव ठाकरे यांना फोन करून युती तोडत असल्याचे सांगितले. जागा वाटपावरून युती होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सुभाष देसाई आणि अरविंद सावंत आले. युती तोडू नका असा आग्रह धरला. त्यावर हा निर्णय माझा नाही. तर तो पक्षाचा आहे, असे मी त्यांना सांगितले. त्यावेळी हेच घडले होते. नरेंद्र मोदी यांनी जे सांगितले ते सत्य नाही. केंद्राचे निरीक्षकही तेव्हा आले होते. महाराष्ट्राचे प्रभारीही होते. त्यांनी मला युती तोडल्याची घोषणा करायला सांगितले, असे एकनाथ खडसेंनी मीडियाशी बोलताना सांगितले.
दरम्यान, युती तोडण्यामागे जागा वाटप हा मुद्दा होताच. शिवसेना तेव्हा १७१ जागांवर लढत होती. देशात भाजपचे वातावरण होते. त्यामुळे अधिकच्या जागा मिळाव्यात अशी भाजपची इच्छा होती. म्हणून युती तोडली. आपली सत्ता येईल असा विश्वास वाटत होता. त्यामुळे युती तोडली. मला काय वाटत होते याच्यापेक्षा पक्षाला काय वाटत होते हे महत्वाचे आहे. पण तेव्हा मलाच बदनाम केले गेले, असेही एकनाथ खडसे म्हणाले.