मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा उद्या वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त राज्यभरात बॅनर लावण्यात आले आहेत. मुंबईतही बॅनर लावण्यात आलेत. मुंबईत लागलेल्या बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या बॅनर्सवर आमदार जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
हे बॅनर आमदार जयंत पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर हे लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मलबार हिल तालुका यांच्याकडून हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनरवर जयंत पाटलांचा उल्लेख बॉस असाही करण्यात आला आहे.
या बॅनरवरुन आता राज्यभरात चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संदर्भातही मुख्यमंत्री पदाच्या चर्चा होतात, तर काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्याही नावाच्या चर्चा झाल्या होत्या. आता या बॅनरवरुन जयंत पाटील यांच्या नावाचीही चर्चा मुख्यमंत्री पदावरुन सुरू आहेत.
'मोदींच्या नावाशिवाय भाजपाकडे काहीच नाही'
'पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपाला ५० किंवा फार तर ६० जागा मिळतील. भाजपाकडे मोदींच्या नावाशिवाय काहीच नाही. राज्यात जे काही सुरु आहे त्याबद्दल जनतेच्या मनात चीड आहे. हाच राग विधानसभेच्या निवडणुकीत मतपेटीतून उतरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत येईल. येणाऱ्या निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढतील असंही जयंत पाटील म्हणाले .
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण?
महाविकास आघाडीचा निवडणुकीत चांगला स्ट्राईक रेट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु मुख्यमंत्री कोण होणार हे संख्याबळावर ठरेल. जर संख्याबळ राष्ट्रवादीकडे आले तर मुख्यमंत्री कोण असेल हे पवार साहेब ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.