मुंबई: राज्यात अघोषित आणिबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असा आरोप भाजपाने केला होता. तसेच यासंबंधित राज्य सरकारला जाब विचारा अशी विनंती देखील भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती. या सर्व प्रकरणावरुन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे वारंवार राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यातच त्यांनी आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहे. हे पत्र त्यांची दिशाभूल करणारे आहे. तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं भाजपला वाटत असून त्यासाठी सर्व प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी भाजपावर केला आहे. त्याचप्रमाणे राज्यपाल कुणाच्यातरी सूचनेनुसार, विनंतीनुसार आणि मनाप्रमाणे वागतात असं आमचं आजही मत नाही. राज्यपाल हे स्वतंत्र विचाराचे आहेत. ते निर्भीडही आहेत. त्यामुळे याप्रश्नी ते निर्भीडपणे निर्णय घेतील असा आमचा विश्वास असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी, सोशल मीडियावर सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहे. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थांनी सांगितले असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्धा आता याबाबत राज्य सरकारला जाब विचारला आहे. एकूणच हा प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्त्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणिबाणीसदृश आहेत या सर्व घटनांची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला जाब विचारावा अशी मागणी भाजपा नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे.