गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात घडत असलेल्या घडामोडींमुळे मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट कधीही निकाल सुनावण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षावरील नियंत्रणासाठी सुरू असलेली चढाओढ यामुळे पुढच्या काही दिवसांत काय घडेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. याचदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी केलेलं विधानाची चर्चा सध्या रंगली आहे.
'मी पुन्हा येणार. मी पुन्हा येईन म्हटलं की, मी येतोच. मी कसा येतो हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आहे, आपण कुठूनही प्रगती करू शकतो, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. कोल्हापूरमधील चंदगड येथे एका कार्यक्रमात संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. या विधानाचे आता वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याची आम्हाला भीती नाही. त्यांच्या त्या वक्तव्याची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असायला पाहिजे. पुन्हा येईन म्हणतायत आणि आलेलेच आहेत. फक्त दोन नंबरला बसलेले आहेत. त्यामुळे ते मी पुन्हा येईन म्हणत असतील आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला ढकलून स्वतः बसत असतील तर त्याची चिंता एकनाथ शिंदे यांनी केली पाहिजे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.