"परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून या राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं.
"घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अत्यंत जपून बोलण्याचा संकेत या देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे," असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यपालांवर टीकेचा बाण सोडला.
काय म्हणाले होते राज्यपाल?“कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही,” असं कोश्यारी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.