मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे बॅनर झळकलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, नेत्या सुप्रिया सुळे, तर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश झाला आहे. शिवतीर्थावर राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्याचे सांगितले जात आहे.
राज ठाकरे यांचा आज वाढदिवस १४ जून रोजी आहे. यानिमित्ताने शिवतीर्थ परिसरात मनसेने बॅनर लावले आहेत. महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असे ठळक अक्षरात या बॅनरवर लिहिले आहे. तसेच हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असा मजकूरही या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे यांचाही मोठा फोटो आहे. याशिवाय पदाधिकारी आणि नेत्यांचेही फोटो आहेत. शिवतीर्थावर हे फोटो लागल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरेंच्या या बॅनवर आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे. राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले. त्यांना शुभेच्छा. आता त्यांच्याकडे एकच आमदार आहे. हा आकडा ५० पर्यंत न्यावा लागेल. राज ठाकरे यांनी कृतीशील कार्य करावे. फक्त लोकांच्या नकला व टोमणे मारणे कमी करावे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील चाहते राज्यभरातून त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते. या कार्यकर्त्यांच्या आणि चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राज ठाकरेंनी खास वेळ राखून ठेवली होती. त्यासाठी शिवतीर्थसमोर फुलांची सजावट करून कार्यकर्त्यांसाठी खास मंडप उभारण्यात आला होता.