Join us  

'तुडवू नका पायदळी महाराष्ट्राच्या मातीची शान; तुम्हाला शिवरायांची आन', जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 11:14 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फॉक्सकॉन प्रकल्पावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

मुंबई- फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी  महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कल्याणासाठी सुरतेवर स्वारी करून खजिना महाराष्ट्रात आणला होता...आणि आताचे राज्यातील शासक इथे होवू घातलेला एवढा मोठा प्रोजेक्ट आणि महसूल गुजरातला देवून आले. फरक स्पष्ट व्हावा एवढाच शुद्ध हेतू, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. 

उद्योग-प्रकल्प अन् गुंतवणुकीबाबत महाराष्ट्राला सहकार्य करा; एकनाथ शिंदेंचा थेट PM मोदींना फोन

ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण, तुम्हाला छत्रपती शिवरायांची आन, दाखवा थोडी तरी अस्मिता, थोडा तरी स्वाभिमान...आज मात्र झुकली महाराष्ट्राची मान, तुडवू नका पायदळी महाराष्ट्राच्या मातीची शान...तुम्हाला शिवरायांची आन..., असंही जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत म्हटलं आहे.

शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. यावेळी हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात यावा, यासाठी प्रयत्न करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, बिलकूल आम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो असताना, राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यासंदर्भात सांगितले होते. उद्योग तसेच पायाभूत सुविधांबाबत राज्याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार