मुंबई- जगभराचं लक्ष लागलेल्या आणि कोट्यवधी भारतीयांचा श्वास काही काळासाठी रोखून धरलेल्या सामन्यात अखेर भारताने विजयी षटकार ठोकलाच. हार्दीक पांड्याने शेवटच्या षटकातील ४ थ्या चेंडूवर षटकार उंचावताच भारतीयांचा एकच जल्लोष सुरु झाला.
दुबईच्या स्टेडियमसह घराघरात आणि मनामनात हार्दीक अभिनंदन म्हणत विजयाचा आनंदोत्सव पाहायला मिळाला. देशातील अनेक महानगरांमध्ये रस्त्यावर येऊन तरुणाईचा जल्लोष सुरु झाला आहे. विशेष, म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही या जल्लोषात स्वत:ला सहभागी करुन घेतल्याचं पाहायला मिळालं.
शरद पवार यांनीही भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा घरी बसून आनंद घेतला. अखेरच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या या रोमहर्षक सामन्यातील शेवटच्या षटकात ४ थ्या चेंडूवर हार्दीक पांड्याने षटकार ठोकताच, शरद पवारांनी हात उंचावत जल्लोष साजरा केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शरद पवार हे आपल्या नातवांसोबत टीव्हीवर मॅच पाहताना दिसत आहेत.
शरद पवारांच्या या व्हिडिओवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी मुंबईवरून पुणे. ३ तास द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन. ५ ते ७ फ.मु. शिंदेंचा कार्यक्रम...७ ला पुण्यातून निघून मुंबई...आत्ता वाजलेत बारा आणी तरीही मॅच बघून भारत विजयी झाल्यानंतरचा हा आनंदोत्सव. कुठून येत असेल इतकी उर्जा ह्या ८२ वर्षाच्या तरूणाकडे काय माहीत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे.
भारताची विजयी सलामी-
आशिया चषकात भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने दिलेल्या १४८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून भारतीय संघाने ही किमया साधली. पाकिस्तानने १९.५ षटकांत सर्वबाद १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात निराशाजनक झाली मात्र अखेर जडेजा आणि पांड्याच्या संयमी खेळीने भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने विजयी षटकार लगावून भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.