मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांना आज पत्राचाळप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊतांच्या घरी जल्लोषाची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.
'माझा मुलगा...'; संजय राऊतांना जामीन मंजूर, मातोश्रींनी दिली पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसापासून होते. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर त्यांना आज जामीन मंजूर केला आहे.
संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये 'दोस्ती का दम, दिखा देंगे अब हम...', असं म्हणत Welcome Back संजय राऊत असं म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते.
नेमका ईडीचा दावा काय?
दरम्यान, ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून १,०३९.७९ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून १०० कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितले. २०१० साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी ८३ लाख रुपये जमा केले होते.