Join us

'कोणी योगी, कोणी भोगी, तर कुणी मानसिक रोगी'; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 10:30 AM

उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत.

मुंबई- महाराष्ट्रासह देशभरात भोंग्याचे राजकारण सुरू असून मशिदीवरील लाऊडस्पीकर उतरवण्यावरून इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तर राज्याबाहेरही अनेक हिंदू संघटना यावरून आक्रमक झाल्या आहेत. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचा थेट परिणाम उत्तर प्रदेशातही दिसून आला. येथील पोलिसांनी विविध प्रार्थनास्थळांवरील तब्बल 10,923 भोंगे उतरविण्यात आल्याचा दावा केला आहे. यूपीत भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरे यांनी योगी सरकारचे कौतुक केलं आहे. तसेच महाराष्ट्रात सत्तेचे भोगी आहेत असं म्हणत ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला. 

आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'!" असं म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे. तर कुणी मानसिक रोगी आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. तर, 35,221 ठिकाणी आवाजाच्या मर्यादेतच लाऊडस्पीकर वाजविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत बुधवारपर्यंत राज्यातील विविध प्रार्थनास्थळाहून तब्बल 10,923 लाऊडस्पीकर काढून घेतले आहेत. एका परिसरातून बाहेर जावा, एवढा आवाज लाऊडस्पीकरमध्ये नसावा, लोकांना या ध्वनीक्षेपकाचा कुठलाही त्रास होता कामा नये, असे योगींनी म्हटले होते. 

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनिश कुमार अवस्थी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्यातील विविध प्रार्थनास्थळावरील नियमबाह्य लाऊडस्पीकर हटविण्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठीचा आदेश 25 एप्रिल रोजी काढण्यात आला असून 30 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी करण्याचेही या आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेजितेंद्र आव्हाड