मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जवळपास पाऊण तास चर्चा झाली. जितेंद्र आव्हाड मातोश्री भेटीमागील कारण अद्याप गुलदस्त्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आव्हाड थेट मातोश्रीवर पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जितेंद्र आव्हाड पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याची माहिती लोकमतच्या सूत्रांनी दिली आहे. आव्हाड यांच्या पुस्तकाचं 18 ऑक्टोबरला प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर गेले होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. या दोन्ही पक्षांमध्ये रणनिती ठरवण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू असताना शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे आव्हाड मातोश्रीवर पोहोचले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाऊण तास चर्चादेखील केली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीनं भाजपाला न मागता पाठिंबा दिला होता. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला शिवसेनेची गरज भासली नव्हती. मात्र शिवसेना सत्तेत असूनही कायम नाराज असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. भाजपावर कायम टीका करणाऱ्या शिवसेना नेतृत्त्वाच्या भेटीसाठी आता आव्हाड मातोश्रीवर पोहोचल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.