मुलींना पळवण्याचा सल्ला देणाऱ्या राम कदमांची जितेंद्र आव्हाडांकडून 'शाळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 03:17 PM2018-09-04T15:17:34+5:302018-09-04T15:21:37+5:30
दहिहंडी उत्सवात राम कदम यांनी केलं होतं वादग्रस्त विधान
मुंबई: दहिहंडी उत्सवात मुलींना पळवून आणण्याचा सल्ला देणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळची व्यक्ती अशी बेजबाबदार विधानं करते. अशा विधानांमुळेच लोकांची हिंमत वाढते, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राम कदम यांच्यावर टीका केली.
भाजपा आमदार राम कदम यांचं विधान अतिशय बेजबाबदार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार मुलींना पळवून आणण्याची भाषा करत असतील, तर राज्यातील मुली कशा सुरक्षित राहणार?, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. 'राम कदम यांच्या विधानामुळे लोकांची हिंमत वाढते. राम कदम यांच्या मतदारसंघातील एखादा मुलगा माझ्या मतदारसंघातील मुलीला पळवून नेईल, अशी भीती मला वाटते,' असंही आव्हाड म्हणाले. राम कदम यांच्या बेताल वक्तव्यानंतर मला वडील म्हणून काळजी वाटते, असं त्यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते राम कदम?
भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.
बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन , दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे !
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 4, 2018
कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित? pic.twitter.com/Z5JAx5ewrN
राम कदम यांचं स्पष्टीकरण
राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाविषयी एका वृत्तवाहिनीनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र राम कदम त्यांच्या विधानावर ठाम होते. आपण या विधानाबद्दल माफी मागणार नसल्याचं ते म्हणाले. 'पालकांना दुखावू नका. त्यांची संमती असेल, तर माझ्याकडे या. लग्न करताना आई-वडिलांचा विचार नक्की घ्या. पालकांची परवानगी असेल, तर पळवून नेण्याचा प्रश्न येतोच कुठे?', असा प्रतिप्रश्न कदम यांनी केला.